Ad will apear here
Next
वंचितांचा आधारवड ठरलेली संस्था
फोटो सौजन्य : वंचित विकास संस्थेची वेबसाइट

तळागाळातील महिला व त्यांच्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य पुण्यातील ‘वंचित विकास’ ही संस्था गेल्या ३३ वर्षांपासून अविरतपणे करत आहे. गरजू महिलांचे सबलीकरण आणि पुनर्विकास यांचे शिवधनुष्य या संस्थेने लीलया पेलले आहे. यासाठी ही संस्था विविध उपक्रम राबविते. ‘लेणे समाजाचे’ या सदरात आज घेऊ या ‘वंचित विकास’ या संस्थेच्या कार्याची माहिती... 
.... 
कर्नाटकात राहणारी सोनाली (नाव बदलले आहे) अभ्यासात नेहमीच अव्वल असायची. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर ती आपल्या कारकिर्दीबद्दलची स्वप्नं रंगवू लागली होती. दरम्यान, महाविद्यालयात असताना ती संजय नावाच्या मुलावर प्रेम करू लागली. शिकून मोठे व्हावे आणि आपल्या जोडीदारासोबत सुखाचा संसार करावा, असे तिला वाटू लागले होते; पण प्रत्येक वेळी आपल्याला हवे तसे होत नसते.

सोनालीच्या घरच्यांनी तिचे लग्न दुसऱ्या मुलाशी ठरविले. आपल्या स्वप्नांचा हिरमोड होत असल्याचे पाहून तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला. संजयने तिच्या स्वप्नांना खतपाणी घातले. सुखी संसाराची स्वप्नं दाखवून संजय सोनालीला पुण्यातल्या बुधवार पेठेत घेऊन आला. काही हजार रुपयांसाठी त्याने तिला एका दलालाला विकले. ज्याच्यासाठी आपण घरच्यांना सोडले, त्यानेच फसविले... सोनालीसाठी हा मोठ्ठा धक्का होता. 

ती ओरडत होती. रडत होती. सुटकेसाठी सर्वांच्या हातापाया पडत होती; मात्र कोणालाच तिची दया आली नाही. तिला या दलदलीतच खितपत पडावे लागले. इच्छा नसताना स्वत:च्या देहाची विक्री करावी लागली. बघता बघता पाच वर्षे गेली. एके दिवशी तिला वंचित विकास या संस्थेच्या माध्यमातून आशेचा किरण दिसला. हे आशादायी किरण तिच्या आयुष्यासाठी टर्निंग पॉइंट ठरले. एचआयव्ही व विविध आजारांबद्दल ‘वंचित विकास’तर्फे प्रबोधन सुरू असताना ती या संस्थेच्या संपर्कात आली. संस्थेने अथक प्रयत्न करून सोनालीची या सगळ्यातून सुटका केली. तिचे पुनर्वसन करून संस्थेने मोलाची कामगिरी बजावली. सध्या सोनाली खराडी येथे खानावळ चालवून उदरनिर्वाह करते.

सोनालीप्रमाणेच देहविक्रय करणाऱ्या अनेक महिलांचे आयुष्य वंचित विकास या संस्थेने वाचवले आहे. त्याचप्रमाणे तृतीयपंथीय, आदिवासी, शेतमजूर, परित्यक्ता व विधवा अशा तळागाळातील महिला व त्यांच्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य वंचित विकास संस्था गेली अनेक वर्षे करत आहे. १९८५मध्ये विलास चाफेकर यांनी या संस्थेची स्थापना केली. गरजू महिलांचे सबलीकरण व पुनर्विकासाचे धनुष्य या संस्थेने लीलया पेलले आहे. यासाठी ही संस्था विविध उपक्रम राबविते. 

नीहार :
देहविक्री करणाऱ्या महिलांच्या मुलांचे पुनर्वसन करण्यासाठी पाच जुलै १९८९ रोजी नीहार या घरकुलाची पायभरणी करण्यात आली. या ठिकाणी राहणाऱ्या तब्बल ९४ मुलामुलींचे पुनर्वसन झाले आहे. तसेच ६० मुलींचे विवाहदेखील झाले आहेत. 

फुलवा :
देहविक्री करणाऱ्या महिलांच्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, या उद्देशाने ‘फुलवा’ हा उपक्रम राबवला जातो. त्याअंतर्गत एकाच छताखाली तीन महिन्यांपासून ते १८ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी पाळणाघर, बालवाडी, अभ्यासवर्ग, अनौपचारिक शिक्षण, सांस्कृतिक कार्यक्रम, संगणक शिक्षण यांसारखे उपक्रम २००५पासून राबविले जात आहेत. 
 
सबला महिला केंद्र :
महिलांच्या सबलीकरणासाठी १९८२पासून संस्थेमार्फत सबला महिला केंद्र चालवले जात आहे. कौटुंबिक कलह कमी करण्यासाठी कुटुंबांना समुपदेशन करणे, संसार मोडू नये म्हणून प्रयत्न करणे हा या केंद्राचा मुख्य उद्देश आहे. पुण्यासह लातूरमध्येदेखील अशा प्रकारचे केंद्र सुरू करण्यात आले आहे.

निर्मळ रानवारा :
लहान मुलांसाठी संस्थेतर्फे ‘निर्मळ रानवारा’ नावाचे मासिक सुरू आहे. मुलांच्या निखळ मनोरंजनाबरोबर त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा, त्यांच्यात सामाजिक जाणीव निर्माण व्हावी, म्हणून हे मासिक सुरू करण्यात आले आहे.
 
दवाखाना व सल्ला मार्गदर्शन केंद्र :
देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी संस्थेतर्फे १९९१पासून दवाखाना चालवला जातो. सर्वसामान्य आरोग्य तपासणी, गुप्तरोगांवर उपचार, डॉट सेंटर, लिंक एआरटी सेंटर, पॅथॉलॉजी लॅब, एचआयव्ही समुपदेशन आदी सुविधा या केंद्रात उपलब्ध आहेत.

देहदान/अवयवदान :
अवयवदानासंदर्भात जनजागृती करण्यासाठी संस्थेतर्फे विविध पातळीवर  उपक्रम राबविले जात आहेत. 

अभया :
अनेक महिला विविध कारणांमुळे एकाकी जीवन जगत असतात. अशा महिलांना अभिव्यक्त होण्याची एक संधी हवी असते. महिलांना बोलते करण्यासाठी अभया नावाच्या व्यासपीठाची निर्मिती संस्थेतर्फे करण्यात आली आहे. निराश झालेल्या सर्व स्तरातील महिला या ठिकाणी एकत्र येतात. मनमोकळेपणे गप्पा मारतात. या उपक्रमामुळे महिलांना आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन मिळण्यास मदत झाली आहे.

संध्या कट्टा :
समाजात दुलर्क्षित होत चाललेल्या ज्येष्ठ नागरिक या घटकासाठी संस्थेने ‘संध्या कट्टा’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांर्तगत समुपदेशन, बैठे खेळ, मनमोकळ्या गप्पांचा आनंद ज्येष्ठ नागरिक लुटतात. 

याशिवाय आणखीही अनेक उपक्रम संस्थेतर्फे राबवले जातात. हे सगळे उपक्रम चालवण्यासाठी संस्थेला अनेक हातांची मदत होते. त्याचबरोबर अनेक अडचणींचाही त्यांना सामना करावा लागला; मात्र समाजासाठी आपण काही तरी देणे लागतो, वंचितांसाठी आपण काही तरी केले पाहिजे, या भावनेने वंचित विकास संस्था गेल्या अनेक वर्षांपासून अविरतपणे कार्य करत आहे. अनेक लोकांचे संसार त्यांनी वाचविले, घडविले. अनेकांना त्यांनी स्वत:च्या पायावर उभे केले. अनेकांना त्यांनी सत्याचा मार्ग दाखविला. त्यामुळे अनेकांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत आणि राहणार आहेत. त्यामुळे आत्मविश्वास उंचावलेली वंचित विकास संस्था आजही वंचितांच्या विकासासाठी धडपडते आहे. 

संपर्क : वंचित विकास, ४०५/९, नारायण पेठ, पुणे – ३०
फोन : (०२०) २४४५४६५८, २४४८३०५०
ई-मेल : vanchitvikas85@gmail.com
वेबसाइट : http://vanchitvikas.org/

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील ‘लेणे समाजाचे’ या सदरातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/CAiHJu या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZWABP
Similar Posts
दाते आणि गरजूंना जोडणारा ई-सेतू आपल्या समाजात वस्तू दान करू इच्छिणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्याचबरोबर विविध वस्तूंची गरज असलेल्यांचीही संख्या लक्षणीय आहे; पण या दोन्ही घटकांना एकमेकांबद्दल नेमकी माहिती नसते. दात्यांना गरजूंपर्यंत आणि गरजूंना दात्यांपर्यंत नेमकेपणाने पोहोचवणारा ई-सेतू ‘डोनेट एड सोसायटी’ या संस्थेच्या वेबसाइटच्या माध्यमातून नितीन घोडके या तरुणाने बांधला
दिव्यांगांच्या प्रगतीसाठी झटणारी ‘इडार्च’ संस्था ज्यांना हात नसतात, त्यांचेही भवितव्य चांगले असू शकते... ज्यांना पाय नसतात, तेही स्वत:च्या पायावर उभे राहू शकतात... ज्यांना डोळे नसतात, तेही डोळस व्यक्तींप्रमाणे कामे करू शकतात... या गोष्टी सत्यात उतरविल्या आहेत पुण्यातील ‘इडार्च’ या संस्थेने. दिव्यांगांना शिकवण्याबरोबरच त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे शिवधनुष्य या संस्थेने पेलले आहे
स्त्री-प्रबोधनासाठी झटणारी संस्था स्त्रियांच्या विविध प्रश्नांचं अध्ययन करून त्याद्वारे काढलेल्या अनुमानाद्वारे आणि त्या प्रश्नांवर शोधलेल्या उपायांद्वारे स्त्रियांमध्ये प्रबोधन घडवून आणण्याचं महत्त्वाचं काम करणारी पुण्यातली संस्था म्हणजे ‘दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्र.’ ‘लेणे समाजाचे’ या सदरात आज पाहू या ‘बाइट्स ऑफ इंडिया’चे प्रसन्न
पर्यावरणप्रेम जागवणारी ‘निसर्गवेध’ ‘ग्लोबल वॉर्मिंग’चे चटके बसलेल्या मानवजातीला आता निसर्गाची महती कळून चुकली आहे. त्यामुळे पर्यावरण रक्षणासाठी, त्याचे संवर्धन करण्यासाठी जगभरात विविध प्रयत्न केले जात आहेत. हे निसर्गभान सर्वसामान्य जनतेत जागविण्यासाठी अनेक संस्था, व्यक्ती जीव तोडून काम करत आहेत. अशीच पुण्यातील एक संस्था म्हणजे निसर्गवेध

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language